नवी दिल्ली- “सिमी’ या बंदी घातलेल्या संघटनेचा म्होरक्या अब्दुल्ला दानिश याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याशिवाय देशद्रोहाच्या आरोपाखाली 19 वर्षांहून अधिक काळ वॉन्टेड होता.
अब्दुल्ला दानिश (वय 58) हा स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीतील सर्वात प्रभावशाली सदस्य होता. उत्तर प्रदेशातील अलिपूर येथील दूधपूर इथे तो सध्या रहात होता. अटक केलेला दनिश हा देशद्रोहाच्या प्रकरणात 19 वर्षांहून अधिक काळ फरार होता.
2001 मध्ये पीएस न्यू फ्रेंड्स कॉलनी, दिल्ली येथे त्याच्याविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविला गेला होता. 2002 मध्ये सत्र न्यायालयाने त्याला या प्रकरणात फरार गुन्हेगार म्हणून घोषित केले होते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह राजधानीच्या परिसराधील विविध भागांमध्ये दनिशच्या हालचालींबद्दल स्पेशल सेलच्या पोलीस उपयुक्तांकडे एकपेक्षा जास्त वर्षांपासून माहिती होती. “एनआरसी’ आणि “सीएए’सारख्या कायद्यांविरोधात मुस्लिम युवकांना भडकावण्याचे काम दनिश करत असे आणि समाजामध्ये धार्मिक असहिष्णूता आणि अशांतता निर्माण करत असे.
भारत सरकारकडून मुस्लिमांविरोधात अत्याचार केले जात असल्याचे तो बनावट व्हिडीओच्या माध्यमातून पसरवत असे. त्यामुळे त्याच्या हालचालींबाबत बारीक लक्ष ठेवून गुप्तचरांकडून त्याच्या ठावठिकाण्याबाबतची माहिती गोळा केली गेली. दिल्लीतील झाकीर नगर भागात पोलिसांनी सापळा लावला आणि छापा घालून त्याला अटक केली.