सोन्याबरोबरच चांदीचे भाव वधारले

sone

जळगाव प्रतिनिधी । आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदारांची पावले सोन्याबरोबरच चांदीकडे वळू लागली आहे. यामुळे चांदीचे भावही वधारले आहेत. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांकडून चांदीच्या विक्रीवर भर देण्यात येत आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ३२,२७० रुपये होता. तो आज सोन्याचा भाव प्रति ग्रॅमसाठी ३९,००० रुपयांवर गेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विश्लेषकांच्या मते सोन्याची चमक आणखी काही काळ तशीच राहण्याची शक्यता आहे. सध्या भारतासह जगभरात मंदीने आपले बस्तान बसविल्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत असून, प्रॉपर्टी बाजारही थंड पडले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांना आकर्षक आणि सुरक्षित वाटू लागली आहे. सोन्याच्या भावात आणखी वाढ होऊन दिवाळीपर्यंत हा धातू विक्रमी स्तरावर पोहोचण्याची शक्यता विश्लेषकांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. चालू वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने २० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. २०१८ मध्ये या धातूने जवळपास सहा टक्के परतावा दिला आहे.

सोन्याप्रमाणेच यंदा चांदीलाही अच्छे दिन आले आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत चांदीचा भाव प्रति किलो ३९,००० रुपयांवरून ५०,००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा अधिक परतावा देण्यात चांदी यशस्वी ठरली आहे. दिल्ली बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विमल गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरातील मंदीच्या भीतीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यांच्या मते देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील सुस्तीव्यतिरिक्त अमेरिका, चीन यांच्यातील व्यापारयुद्धामुळेही सोने मजबूत होत आहे. या शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन सोन्याच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी सोने-चांदीला पर्याय नसल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.

Protected Content