यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व खानदेशातील यात्रांपैकी सुप्रसिद्ध जागृत श्री मुंजोबा देवस्थान अट्रावल तालुका यावल येथील यात्रा माघ शुद्ध महिन्याच्या येणाऱ्या पहिल्या शनिवारी दिनांक १ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे.

यंदाची यात्रा ही ३ फेब्रुवारी, ८ फेब्रुवारी व १० फेब्रुवारी अशी आहे हा यात्रा उत्सव माघ महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत दिनांक १२ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. अट्रावल भालोद रस्त्यालगत अट्रावल गावापासून एक किलोमीटर तर भालोद पासून दोन किलोमीटर अंतरावर एका शेकडो वर्षांपूर्वीच्या विस्तीर्ण अशा वडाच्या झाडाखाली हे देवस्थान आहे. यात्रेमध्ये मोठ्या उत्साहाने संपूर्ण जिल्ह्यासह परिसरातील भाविक श्रद्धेने येत असतात व आपल्या मनातील प्रपंचा विषयी या जागृत मुंजोबाला नवस मानत असतात व आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर येथे नवस फेडण्याची प्रथा आहे.
आपली इच्छा पूर्ण झाल्यावर वरण-बट्टीचा नैवेद्य या देवस्थानावर चढविला जातो. तसेच पूजा पत्री चढवून वाजत गाजत आपल्या कुटुंबीयांना नातेवाईकांना व आप्तेष्टांना आमंत्रित करून प्रसाद दिला जातो अशी प्रथा आजही कायम आहे. यात्रा उत्सवासाठी तयारी पूर्णत्वाकडे आलेली असल्याचे मुंजोबा मंदिराच्या ट्रस्टींनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून अट्रावल येथील कोळी पंचमंडळी या देवस्थानाची देखभाल करीत आहे. यात्रेत भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलं आहे. टर्म यावल भुसावळ आगारातून ज्यादा बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. संपूर्ण खानदेशातून तसेच परराज्यातून येणाऱ्या भाविकांची ही संख्या मोठी असते. यात्रेत फराळाची दुकाने थंड पेयाची दुकाने उसाचा रस लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने संसार उपयोगी लाकडी वस्तू अशी अनेक दुकाने यात्रेदरम्यान असतात. यात्रोत्सवानंतर श्री मुंजोबा देवस्थानावर भाविकांनी वाहिलेली पूजा, दही-लोणी ही सर्व पूजा पत्री आपोआप पेट घेत असते, यालाच मुंजोबाने अग्नीडाग घेतला असे म्हटले जाते. याची आख्यायिका अशी आहे की देवस्थानाच्या उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वतातून एक ज्योत येते व मुंजोबा अग्नीडाग घेतला असे भाविक मनात असतात.