चोपडा येथे श्री खंडेराव महाराज पालखी उत्साहात

WhatsApp Image 2020 01 09 at 7.59.39 PM

चोपडा, प्रतिनिधी | येथील श्री समस्त सूर्यवंशी बारी समाज मंडळातर्फे दरवर्षी पौष पौर्णिमेला आयोजित केला जाणारा शतकोत्तर परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज पालखी उत्सवात भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते.

पौष शु. चतुर्दशीला चोपडा येथील बारीवाड्यातून निघून रात्रभर पायी प्रवास करून पौर्णिमेला पहाटे कोलंबा ता. चोपडा येथील तापी नदीपात्रात पोहचते. तेथे विधिवत स्नान, पूजा केल्यानंतर महाप्रसाद होतो. सालाबादाप्रमाणे यंदाही दि. ९ जानेवारी रोजी बारीवाड्यातील लाल खांब चौक येथून श्री खंडेराव महाराज मंदिरातून पालखीला दुपारी चार वाजता प्रारंभ झाला. बारीवाडा, गुजराथी गल्ली, मेन रोड, आझाद चौक मार्गे पाटील गढी व तेथून पुढे तालुक्यातील कोळंबा येथे तापी नदी पात्रात पालखी रवाना झाली.’ येळकोट येळकोट जय मल्हार’चा नामघोष, ढोलताशाच्या गजरात समाज बांधव पालखी सहभागी झाले होते. गरबा, लेझिम, काठी नाचवणे, अश्वारूढ श्री खंडेराव या साऱ्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत बालक युवकांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. शहरात ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

काठी नाचवणे ठरला औत्सुक्याचा विषय

२१ फूट लांबी आणि १५ किलो वजनाच्या अखंड बांबूला विविध रंगांच्या कापडी पताका बांधून सजवलेल्या या मानाच्या काठीला मिरवणुकीत नाचावताना पाहणे औत्सुक्याचे असते. एका हातावर, एका बोटावर, दातावर, डोक्यावर ही काठी ठेवून तोल सांभाळत नाचणे हे कौशल्याचे असते. विविध वयोगटातील युवक हे काम अतिशय कौशल्याने करतात.पालखी उत्सव आयोजनासाठी पंच मंडळाचे अध्यक्ष संजय हरचंद बारी, उपाध्यक्ष संजय रघुनाथ बारी, सचिव भगवान शंकर बारी, सहसचिव सोमनाथ जीवराम बारी यांच्यासह पंच मंडळाचे सदस्य व समाज बांधवांनी सहकार्य केले. नागवेल मित्र मंडळ, बारी समाज महिला मंडळ चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content