सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन उपक्रम

 

फैजपूर, प्रतिनिधी । सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.

लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेश उत्सव सुरू केला होता त्यांच्या मूळ उद्देशाला तिलांजली देत समाजात मोठ-मोठ्या गणपती मूर्तींची स्थापना करून मिरवणुकीच्या वेळी धांगडधिंगा, डीजेचा मोठा आवाज व मोठ्या प्रमाणात युवकांचे व्यसनाधीनतेचे प्रमाण तसेच दरवर्षी बाप्पाला निरोप देताना अनेक ठिकाणी युवकांचे बुडून मृत्यू पावल्याच्या घटना याला आपणच जबाबदार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

यावर्षी या सर्व गोष्टींना फाटा देऊन सतपंथ चारिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या मार्फत तसेच प्रशासनाला सोबत घेऊन परिसरातील घराघरातील गणेशमूर्तीं व निर्माल्य संकलन करून विधीवत पूजा करून वडोदा येथील भावेश संजय चौधरी यांच्या भूजल ॲग्रोटेकने पावसाचे पाणी साठवून तयार केलेल्या खड्‍ड्यात विसर्जन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला व कोणत्याही प्रकारचे जीवित हानी झाली नाही. जमा झालेल्या निर्माल्याचे सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ फैजपूर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांच्या भक्तांनी राबविल्याने पर्यावरणाची हानी न होता खऱ्या अर्थाने गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आहे.

विसर्जनाच्यावेळी गणेश भक्त तसेच मंडळांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रांत डॉ. अजित थोरबोले, फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, एपीआय प्रकाश वानखडे, त्यांचा स्टाफ यांच्या हस्ते सामूहिक आरती करून विधीवत विसर्जन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत फैजपूर शहरातील एकूण बारा गणेश मंडळ पैकी नऊ गणेश मंडळांनी उपक्रमात सहभाग घेऊन घराघरातील १९१ गणेश मुर्ती तसेच जवळपास दोनशे ते अडीचशे किलो निर्माल्य संकलन करण्यात आले. प्रथमच निर्विघ्नपणे झालेल्या या गणेश विसर्जनाचा बाप्पांसह लोकमान्य टिळक आगरकर यांनाही निश्चितच आनंद झाला असेल असे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. या उपक्रमास सर्वांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याने सतपंथ चारीटेबल ट्रस्ट व प्रशासनाने धन्यवाद दिले.

Protected Content