शहरात श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञानिमित्त शोभायात्रा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाविकांच्या जल्लोषांमध्ये आणि भगवंताच्या नामस्मरणात आज रविवार, दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी शहरात श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.

येथील समस्त झिंझुवाडीया (सोनी) परिवारातर्फे पांजरापोळ गोसेवा संस्थानामध्ये श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञाचे दि. ४ ते १० सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने शहरामध्ये संत श्री अनुजदासजी महाराज यांचे आगमन झालेले आहे. दुपारी पारख नगरातील गोवर्धनदास हवेली येथून भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये शोभायात्रा काढण्यात आली.

या शोभायात्रेनंतर भागवत कथा श्रवणाला प्रारंभ झाला असून पुढील सहा दिवस भागवत कथा सुरू राहणार आहे. शोभायात्रेमध्ये मोठ्या रथमध्ये श्रद्धेय संतश्री अनुजदासजी महाराज होते. तर महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतले होते. त्याचबरोबर पुरुष आणि लहान मुलांनी देखील शोभायात्रेत सहभाग घेतला. भगवंतांच्या भजनांनी आणि नामस्मरणाने शोभायात्रेमध्ये उत्साह भरून गेला होता.

शोभायात्रा पारख नगर, पांडे चौक, नेरी नाका चौक मार्गे पांजरापोळ गो संस्थान येथे विसर्जित झाली. या ठिकाणी अनुजदासजी महाराज यांचे भाविकांनी स्वागत केले. सुरुवातीला भगवंताची महाआरती करण्यात आली. यानंतर अनुजदास महाराज यांनी भागवत सप्ताह प्रारंभ केला. पहिल्या दिवशी महाराजांनी गोकर्ण उपाख्यान, भागवत महात्म्य, महर्षी व्यास आणि महर्षी नारद यांच्यातील संवाद कथा, शुक्र मुनी यांचे आगमन आदींची माहिती सांगितली. याप्रसंगी झिंझुवाडीया परिवारासह शहरातील महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content