जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगावसह देशभरात गुरुवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शहरातील मेहरुण तलाव परिसरात विसर्जनानंतर झालेली घाण, विखुरलेले निर्माल्य संकलन करून परिसर स्वच्छ करण्याचे कार्य नेहरू केंद्र जळगावतर्फे करण्यात आले. उपक्रमासाठी श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे सहकार्य लाभले.
जळगाव शहरातील मेहरुण तलावात शहरासह परिसरातील सर्व लहान मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत असते. गुरुवारी तलावात गणेश मूर्ती विसर्जन करताना अनेकांनी निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा तलाव परिसरातच टाकला होता. तलाव आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी जळगाव शहर मनपातर्फे विविध संस्थांना निवेदन पाठविण्यात आले होते.
भारत सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मेहरुण तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. १ तास स्वच्छतेसाठी हा प्रण लक्षात घेत स्वयंसेवकांनी आणि श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्र जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी, युवा स्वयंसेवक शाहरुख पिंजारी, हेतल पाटील, अजय जाधव यांच्यासह श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी, शिक्षक अतुल चाटे, संजय बडगुजर, लिपीक भगवान लाडवंजारी आदींनी परिश्रम घेतले.