नवी दिल्ली । गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh ‘लेटर बाँब’मुळे गोत्यात आल्याने त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून या अनुषंगाने राष्ट्रवादीची दिल्लीत तातडीची बैठक होत आहे. यात राजीनाम्याचा निर्णय होण्याचे संकेत मिळाले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबाँबमुळे महाविकास आघाडी सरकार समोरील अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता विरोधक अतिशय आक्रमक झाले असून गृहमंत्री Anil Deshmukh यांचा राजीनामा मागितला जात आहे. देशमुख यांच्याशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच सविस्तर चर्चा केली आहे. यामुळे आता देशमुख हे आपल्या पदाचा राजीनामा देणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
यातच आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपत्कालीन बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गृहमंत्री Anil Deshmukh यांची जोरदार पाठराखण केली. ते म्हणाले की, सचिन वाझे यांच्या प्रकरणातील अनेक जण उघड पडण्याची भिती असल्यामुळेच आता कथित लेटर समोर करण्यात आले आहे. वाझे हे अनेक वर्षे नोकरीवर नसल्याने त्यांनी शिवसेना जॉईन केली असून यात गैर ते काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगले काम करत असल्याचे उदगारही त्यांनी सांगितले. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देखील ना. जयंत पाटील यांनी दिली.
एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली असली तरी भाजपने अतिशय आक्रमकपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी लाऊन धरली आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांनी राजीनामा देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला नाही तर भारतीय जनता पक्ष राज्यभरात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सुध्दा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्रीदेखील गोत्यात आला आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्यानंतर आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागल्यास सरकारची नाचक्की होईल हे मात्र नक्की !