गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा- तृप्ती देसाई

मुंबई । Trupti Desai : परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केल्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

परमबीर सिंग यांच्या लेटर बाँबमुळे राज्य सरकार बॅकफुटवर आले असतांना आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होऊ लागली आहे. यात आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई Trupti Desai यांची भर पडली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

“राज्यात नेमके काय चालले आहे, हे महाविकासआघाडी सरकार आहे की “महावसुली सरकार”आहे. राज्यातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले. महिलांच्या हत्येचे आरोप करण्यात आले. काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले. पण कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. अशी अनेक प्रकरणे दडपली गेली.” असे तृप्ती देसाईंनी Trupti Desai सांगितले.

गृहमंत्री पोलिसांना हप्ते गोळा करायला सांगतात, खंडणी वसूल करायला सांगतात आणि हे जेव्हा पुराव्यानिशी समोर येते तेव्हा तातडीने नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे तरच हे सरकार पारदर्शक आहे असे म्हणता येईल,” ,” असे तृप्ती देसाईंनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. गृहमंत्र्यांनी अटकेतील वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटींचे हप्ते वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते, असा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

मुंबईतील मद्यालये, पब्ज आणि हुक्का पार्लरचालकांकडून महिन्याला ४०-५० कोटी रुपयांचे हप्ते जमा होऊ शकतात आणि अन्य मार्गांनी रक्कम जमा करता येतील, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या होत्या, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला.

यामुळे आता विरोधक अतिशय आक्रमक झाले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला जात आहे. देशमुख यांच्याशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच सविस्तर चर्चा केली आहे. यामुळे आता देशमुख हे आपल्या पदाचा राजीनामा देणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून याबाबत आज घडामोडी गतीमान होऊ शकतात. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापले हे मात्र निश्‍चित.

Protected Content