यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना नवीन शिधापत्रिका लाभार्थ्यांना आता मोफत ई-शिधापत्रीका देण्याची योजनेची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी सुरू झाली आहे. या सर्व सुविधांसाठी नवीन प्रबळ अशी संगणक यंत्रणा उभी करण्यात आली आहे. ई-शिधापत्रीका वितरीत करण्यासाठी संदर्भातील आदेश शासनाच्या वतीने फेब्रुवारी २०२३ मध्ये महसुल प्रशासनास दिले होते.
नागरिकांनी आवश्यक असलेली नवीन शिधापत्रीका मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करून कोणत्याही सेतु सुविधा केन्द्रांवर दाखल केल्यास अल्प अशी नाममात्र फीची आकारणी करून आपल्यास सेतु केन्द्रावरून ऑनलाईन ई -शिधापत्रीका प्राप्त होईल. राज्य शासनाच्या या नवीन प्राप्त होणाऱ्या शिधापत्रिकेत क्यु आर कोड देखील असेल, शासनाच्या या संदर्भातील निर्णयामुळे शहरी भागातील व तालुक्यातील विविध गावातील ग्रामीण क्षेत्रातील गरजू गोरगरीब नागरिकांची नवीन शिधापत्रीका मिळून देण्याच्या नांवाखाली मोठी आर्थिक लूट करणाऱ्या महसुल विभागात सक्रीय असलेले काही खाजगी पंटर व दलालांची दुकाने आता कायमची बंद होणार आहे.
शासनाच्या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. आता सेतु सुविधा केद्रांच्या माध्यमातून भविष्यात ई-शिधापत्रीका मिळवण्यासाठी आर्थिक पिळवणूक होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.