नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राफेल डीलमधील महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी दिली आहे. दरम्यान, कागदपत्रे चोरीप्रकरणी सरकारने काय कारवाई केली हे सांगावे, असे आदेश कोर्टाने महाधिवक्त्यांना दिले आहेत.
राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. मात्र या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, यानिमित्ताने मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाने राफेल डीलमध्ये हस्तक्षेप करुन समांतर वाटाघाटी केल्याचे वृत्त ‘द हिंदू’ वृत्तपत्राने दिले होते. काही गोपनीय कागदपत्रांच्या आधारे ‘द हिंदू’ने हे वृत्त दिले होते. ही कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. ‘द हिंदू’ने ज्या कागदपत्रांच्या आधारे राफेल डीलबद्दलचे वृत्त दिले, ती कागदपत्रं सादर केल्यास देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचेल, असा दावा वेणुगोपाल यांनी केला. यानंतर याचिकाकर्ते आणि वकील प्रशांत भूषण यांनी युक्तिवाद केला. सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा गंभीर आरोप भूषण यांनी केला. महाधिवक्त्यांनी कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती दिल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांची कानउघाडणी केली. ‘कागदपत्रं चोरीला गेल्यानंतर सरकारने काय पावले उचलली?,’ असा प्रश्न गोगोई यांनी महाधिवक्त्यांना विचारला. महत्त्वाची माहिती असलेल्या फाईल चोरीला गेल्यानंतर सरकारने काय केले, याचा पूर्ण तपशील आज दुपारी 2 वाजता द्या, अशा सूचना सरन्यायाधीशांनी महाधिवक्त्यांना दिल्या. यावेळी युक्तीवाद करताना महाधिवक्त्यांनी कागदपत्रांच्या चोरीसाठी ‘द हिंदू’ला जबाबदार धरले. द हिंदूने संरक्षण मंत्रालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्वत:च्या सोयीने वापर केल्याचा आरोपदेखील सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी केला.
सुनावणीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी काही कागदपत्रे सादर केली. मात्र, या प्रकरणी आणखी नवीन पुरावे स्वीकारू शकत नाही, असे सांगत त्यांनी दिलेली कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला. सरकारच्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ यांनी बाजू मांडली. ‘राफेल’संबंधी महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून कर्मचाऱ्याकरवी चोरीला गेली आहेत. याचा तपास सुरू आहे. हे खूप संवेदनशील प्रकरण आहे, असे त्यांनी सांगितले. याचिकाकर्ते अॅड. भूषण आणि दोन वृत्तपत्रांसह अन्य व्यक्ती चोरी गेलेल्या कागदपत्रांवर विश्वास दाखवत आहेत. त्यामुळे त्यांना अधिकृत गोपनीयता कायद्यान्वये खटल्याचा सामना करावा लागू शकतो. आम्ही दोन वर्तमानपत्रे आणि एका ज्येष्ठ वकिलाविरोधात कारवाई करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी कोर्टात दिली.