महिलाविषयक कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी हवी – आशा शिरसाठ

IMG 20190306 WA0015

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील युगंधरा फाउंडेशन, देवरे फाउंडेशन, स्त्री रोग संघटना आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ८ मार्च या कालावधीत नारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज (दि.६) पाटणा येथे ‘महिला कायदा व सुरक्षा’ या विषयावर एडव्होकेट आशा शिरसाठ यांनी नारी सप्ताहाचे चौथे पुष्प गुंफले, यावेळी महिला भगीनींना कायदाविषयक माहिती स्पष्ट करण्यात आली, यावेळी जवळपास १५० महिलांची हिमोग्लोबिन तपासणीही करण्यात आली.

महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देणे हे सर्वांचे कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहायला हवे. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला महिलांनी पुढे यायला हवे. प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकार्‍याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आलेली असते, हे कायदे महिलांना माहित असायला हवेत. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा असो वा राज्य महिला आयोगामार्फतही महिलांच्या हक्क आणि अधिकारांची जपणूक केली जाते. यासोबतच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून विशाखा गाईड लाईन्सची अंमलबजावणी राज्यात सुरु असून राज्यभर तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महिला, मुली आणि बालकांसाठीही कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु असल्याचे आशा शिरसाठ यांनी सांगितले.

यावेळी युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, देवरे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.उज्वला देवरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप भांडारकर, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, रांगोळी कलाकार कावेरी पाटील, माजी सरपंच अभिजीत शितोळे, योगिता राजपूत, अनिता शर्मा, विद्या कोतकर, स्वप्निल कोतकर, ब्रिजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुकुंद शितोळे यांनी केले तर प्रास्ताविक शितल शितोळे यांनी व आभार मुकुंद शितोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन शितोळे, गणपत चौधरी, निलेश साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content