धक्कादायक : कमरेला बांधलेली दोरी तुटून पाण्यात पडल्याने एकाचा बुडून मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा शिवारातील शेतात विहीरीचे काम करत असतांना कमरेला बांधलेली दोरी तुटल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २१ मे रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपीचंद पंढरीनाथ बाविस्कर (५८, रा. कानळदा, ता. जळगाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपीचंद बाविस्कर हे आपल्या कुटुंबासह जळगाव तालुक्यातील कानळदा येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गावातील विश्वास नाना पाटील यांच्या शेतातील विहिरीचे काम सुरू होते. या ठिकाणी गोपीचंद बाविस्कर व काही कामगार कामाला आलेले होते. विहिरीचे काम करत असतांना गोपीचंद बाविस्कर यांच्या कमरेला दोरी बांधण्यात आली होती. काम करत असतांना अचानक कमरेला बांधलेली दोरी तुटल्याने ते विहीरीती पाण्यात पडले. पोहता न असल्याने ते पाण्यात बुडाले. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

Protected Content