Home Cities अमळनेर कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह नेल्याचा धक्कादायक प्रकार ; अमळनेर नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह नेल्याचा धक्कादायक प्रकार ; अमळनेर नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

0
8


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिवंतपणी दूषित पाणीपुरवठा आणि मृत्यूनंतरही सन्मानाची वानवा अशा गंभीर प्रश्नांनी अमळनेर शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीतून बेवारस मृतदेह नेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नगरपरिषदेच्या संवेदनशीलतेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शहराची ओळख केवळ रस्ते, इमारती आणि विकासकामांवर होत नसते, तर नागरिकांना मूलभूत सुविधा देताना आणि मृत्यूनंतरही मानवी सन्मान राखताना प्रशासन किती जबाबदारीने काम करते यावरही शहराची प्रतिमा अवलंबून असते. मात्र अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटनांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक धक्कादायक घटना म्हणजे शहराच्या हद्दीत आढळलेल्या एका बेवारस मृतदेहाची शवविच्छेदनानंतर विल्हेवाट लावताना कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून वाहतूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नियमानुसार अशा बेवारस मृतदेहासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराकडून ही गंभीर चूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मृत्यूनंतरही माणसाच्या सन्मानाची पायमल्ली झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी अमळनेर येथील अमरधाम स्मशानभूमीतील सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई गढरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुर्गेश पाटील (डी.पी.) यांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सरण (गौरी) उपलब्ध नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे काही मृतदेह पूर्णपणे जळत नसल्याने अर्धवट जळालेल्या अवशेषांची भटक्या कुत्र्यांकडून विटंबना होत असल्याचे प्रकार घडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने दुःखाच्या प्रसंगी आलेल्या नातेवाईकांनाच अनेक व्यवस्था स्वतः कराव्या लागत असल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली होती. अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील विषयातही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान, शहरातील पाणीपुरवठ्याबाबतही गंभीर बाब समोर आली होती. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी स्वतः जलकुंभात उतरून पाहणी केल्यानंतर गेल्या २२ ते २४ वर्षांपासून काही जलकुंभांची स्वच्छता झाली नसल्याचा दावा केला होता. टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त झाली. या सर्व घटनांकडे एकत्रितपणे पाहिल्यास नागरिकांसमोर एक गंभीर प्रश्न उभा राहतो. जिवंत असताना स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची अपेक्षा, तर मृत्यूनंतर सन्मानाने अंत्यसंस्काराची हमी नागरिकांना मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र कचरा घंटागाडीतून मृतदेह नेल्याच्या घटनेबाबत अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदाराकडून अक्षम्य चूक झाली आहे.

अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही या प्रकाराचा निषेध केला असून, संबंधित ठेकेदाराची कोणतीही गय केली जाणार नाही. त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. अमळनेर शहरातील या घटनांनी प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नागरिकांना मूलभूत सुविधा आणि मानवी सन्मान मिळावा यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound