


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करत पाचोरा येथील व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता क्षेत्राला महत्त्वाचे स्थान असून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्याबाबत अवमानकारक भाषा वापरणे हे निषेधार्ह असल्याचे व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे पत्रकारिता क्षेत्राचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतो. लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा संविधानिक अधिकार असून त्याचा आदर केला गेला पाहिजे. मात्र पत्रकारांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणे ही बाब लोकशाही मूल्यांना धक्का देणारी आहे.
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, तालुका कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहर अध्यक्ष प्रविण बोरसे, तालुका संघटक चिंतामण पाटील, सहसचिव जाविद शेख, ज्येष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, अनवर शेख आदी उपस्थित होते. या निवेदनावर व्हाईस ऑफ मीडियाचे ज्येष्ठ सल्लागार दिलीप जैन, दिपक पवार, दिलीप परदेशी, नरसिंग भुरे, निखील मोर, बाबुलाल पटेल, प्रशांत येवले आणि बंडू सोनार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



