भाजपला धक्का; भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे बांधणार शिवबंधन

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना भारतीय जनता पक्षात बंडखोरीला सुरुवात झाली आहे. २०१९ मध्ये बंडखोरी करून पश्चिम मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी पक्षाला जय श्रीराम करीत उद्धवसेनेचे शिवबंधन बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. आपल्यासोबत ६ नगरसेवक आणि ३५ पदाधिकारी टप्प्याटप्प्याने येतील, असा दावा त्यांनी केला आहे. रविवारी (७ जुलै) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन आहे. या वेळी हा प्रवेश सोहळा होईल, अशी चर्चा आहे.

मागील २० वर्षांत राजू शिंदे यांची ही पक्ष विरोधात चौथ्यांदा बंडखोरी आहे. यापूर्वी मनपात उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती या पदांसाठी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. २०१९ मध्ये पश्चिममधून अपक्ष निवडणूक लढवली होती. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील भुमरे यांना तिकीट न देता विनोद पाटील यांच्यासाठी आग्रह धरला होता.

Protected Content