अजित पवारांना धक्का; ज्येष्ठ नेत्यांचा शरद पवार गटात प्रवेश


छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांनी शनिवारी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थतीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलतांना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. साहेबांना सोडून गेलेले पुन्हा विधान परिषदेच्या पायऱ्यांवर दिसले नाहीत असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, पक्ष प्रवेश होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना पाथरीतून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यांची शरद पवार गटात घरवापसी झाल्यामुळे आता परभणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

यावेळी बोलतांना दुर्राणी म्हणाले, आज पर्यंत शरद पवार साहेब यांना सोडून गेलेले पुन्हा विधान परिषदेच्या पायऱ्यांवर दिसले नाहीत. ते शून्य झाले. बरे झाले मी शून्य होण्याच्या आधीच आलो. लोकसभा निवडणुकीत देशाचे चित्र समोर आले. जे भाजपसोबत गेले लोकांनी त्यांना शून्य केले. देशात गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात जातीयवाद पसरला आहे. आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षेने शरद पवार यांच्याकडे पाहतो. मुस्लिम समाजाकडे चांगल्या भावनेने पाहणारे नेतृत्व म्हणजे पवार साहेब आहेत”, असे ते म्हणाले.