सिंधुदूर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूकीच्या अनुंषगाने कोकणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. कोकणातील माजी आमदार राजन तेली हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांच्या पक्षांतरामुळे भाजप, नारायण राणे व शिंदे सेनेच्या दीपक केसरकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते राजन तेली हे आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांना सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे.
राजन तेली हे भाजपकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. हा मतदारसंघ भाजपनं घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, सध्या तिथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दीपक केसरकर हे आमदार आहेत. ही जागा भाजपला सुटणं अशक्य असल्याने शेवटी तेली यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा पर्याय स्वीकारल्याचे बोलले जाते. तेली हे सावंतवाडीमधील वजनदार नेते आहेत. ते माजी आमदार आहेत. अखंड शिवसेनेत असल्यापासून त्यांचा या भागात दरारा आहे. प्रसंगी त्यांनी राणेंशीही पंगा घेतला आहे. त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळणार आहे. केसरकर हे शिंदे यांच्यासोबत गेल्यानं निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहे. या सगळ्याचा फटका त्यांना बसू शकतो.