अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्वच्छता अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांची दक्षिण आफ्रिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागातून एकमेव त्यांची निवड झाली असून राज्यातील एकूण 5 मुख्यधिकाऱ्यांची निवड झाली आहे.
19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या केपटावून शहरात स्वच्छता अभियानबाबत अभ्यासासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र्र शासनाच्या नगरविकास विभागाने या दौऱ्यासाठी राज्यातील शोभा बाविस्कर ( अमळनेर), वसुधा फड (सहाययक आयुक्त , लातूर ),वैभव साबळे (वेंगुर्ला), विजय सरनाईक , ऋचा तंवर या पाच मुख्यधिकाऱ्यांची निवड केली आहे.
नाशिक विभागातून शोभा बाविस्कर यांची एकमेव निवड करण्यात आली असून त्यांनी जामनेर नगरपरिषदेत स्वच्छता अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्यामुळे जामनेरला देशात 26 वा क्रमांक मिळाला होता. त्याचप्रमाणे अमळनेर नगरपरिषदेत देखील हागणदारी असलेल्या बोरी नदी काठावर सुशोभित वृक्ष लागवड , पर्यावरण संवर्धन तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू या धर्तीवर प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यापासून बगिच्यात बाक बनवले आहेत. केंद्रशासनाच्या प्रत्येक सर्वेक्षणात अमळनेर नगरपरिषद उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांची या दौर्यासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे नगरविकास विभागाचे सचिव मनिषा म्हैसकर, नगराध्यक्ष पुष्पलताताई पाटील यांनी स्वागत केले तर माजी आमदार साहेबराव पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सत्कार केला आहे.