मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून शपथ घ्यायला रोखणारी अदृश्य शक्ती कोणती ?” असा खोचक सवाल विचारत त्यांनी विधानसभेत केलेले भाषण हे उसने अवसान असल्याची टीका आज शिवसेनेने केली आहे.
काल शिंदे सरकारने बहुमत चाचणीत यश संपादन केल्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये यावरच तिखट भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, बहुमत चाचणीत भाजपपुरस्कृत शिंदे गटास १६४ आमदारांनी पाठिंबा दिला व विरोधात ९९ मते पडली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार बहुमत चाचणीच्या वेळेस गैरहजर राहिले. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री विधानसभेत पोहोचू शकले नाहीत याचे आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणार्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
फडणवीस यांचे अभिनंदनाचे भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते. मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असे विधान यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गमतीचे आहे. ज्या प्रकारे ते आले ते त्यांच्या स्वप्नातही नसेल. आधीची अडीच वर्ष ते आलेच नाहीत व आताही दिल्लीच्या तडजोडीने ते लंगड्या घोड्यावर बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत याचा विसर त्यांना पडू नये.
यात पुढे म्हटले आहे की, शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्त्विक नसते. त्यास नीतिमत्तेचा कितीही मुलामा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही! भाजपने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे! असे यात म्हटले आहे.