दळभद्री विचार व लढायांसाठी समाज माध्यमांचा वापर- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । सध्या फेसबुक-व्हाटसअ‍ॅपसारखी माध्यमे संघ भाजपकडे झुकलेली असलेल्या आरोपांवरून शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. दळभद्री विचार व लढायांचे माध्यम म्हणून समाज माध्यमांचा वापर होत असल्याने याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखात फेसबुक प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, फेसबुक, ट्विटरसारख्या समाज माध्यमांतून समाज जोडण्याचे काम न होता समाजात दुभंग आणि द्वेष पसरवण्याचे कार्य जोरात सुरू आहे. समाज माध्यमांतून उदयास आलेल्या असंख्य गोबेल्सनी स्वतःचा कायदा, स्वतःची न्यायव्यवस्था, स्वतःचे तुरुंग, आरोपींसाठी पिंजरे केले आहेत व एकांगी झोडपेगिरी करत हे सर्व गोबेल्स कोणालाही आरोपी करून सुळावर चढवत असतात याबाबतचे सत्य अमेरिकन माध्यमांनी उघड केले आहे.

२०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपने मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. त्यात भाजपच्या समाज माध्यमांवर काम करणाऱया पगारी फौजांचे योगदान मोठे होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसेच राहुल गांधी यांना या गोबेल्स टोळीने साफ निकम्मे ठरवले. मनमोहन हे ङ्गमौनीबाबाफ तर राहुल गांधी यांना ङ्गपप्पूफ ठरवण्यात आले. त्याच वेळी मोदी हे सुपरमॅन, एकमेव तारणहार, विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे शिक्कामोर्तब समाज माध्यमांनी करून टाकले. गेल्या सात वर्षांत खोटयाचे खरे व खर्‍याचे खोटे करण्याचे प्रकार समाज माध्यमांतून उघडपणे झाले.

यात पुढे म्हटले आहे की, हिंदुस्थानातील अफाट लोकसंख्या हाच फेसबुकचा जगातला मोठा बाजार आहे. लॉकडाऊन काळात हिंदुस्थानातच सर्वाधिक लोक फेसबुकचा वापर करीत होते. धंद्याचे सगळयात मोठे ठिकाण म्हणून फेसबुक हिंदुस्थानकडे पाहते. फेसबुकचे प्रकरण एकतर्फी नाही. राहुल गांधी यांनी भाजपवर आरोप केले तसे काही आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले आहेत. निवडणुकीपूर्वी केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुकशी संगनमत केल्याप्रकरणी काँग्रेसला पकडले होते. आता कोणाच्या तोंडाने भाजपवर आरोप करताय?फफ असा सवाल श्री. प्रसाद यांनी डागला आहे.

फेसबुकसारख्या माध्यमांवर वाद-प्रतिवाद व्हायला हरकत नाही, पण द्वेष पसरवून देश व समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी. द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून फेसबुकसारख्या कंपन्यांना डोळेझाक करता येणार नाही. सोशल माध्यमांवर एखाद्याची यथेच्छ बदनामी करणे हा आता पगारी व्यवसाय झाला आहे व त्यातून कोणीही सुटलेले नाही.

कालपर्यंत मनमोहन सिंग यांना दूषणे देणारे आज त्याच माध्यमांचा वापर करून पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवतात याचे वाईट वाटते. तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. तेव्हा उद्योग-व्यवसायातले किमान नीती-नियम पाळावेच लागतील. धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही असे यात म्हटले आहे.

Protected Content