मुंबई प्रतिनिधी । कुख्यात हाफीज सईदला पाकने खरोखर अटक केली की अटकेचे ‘नाटक’ केले असा प्रश्न शिवसेनेने आज उपस्थित करून पाकच्या दुटप्पी भूमिकेवर टिका केली आहे.
मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफीज सईद याला काल पाक सरकारने अटक केली. यावर शिवसेनेचे मुखपत्र असणार्या सामनातून भाष्य करत टिकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अर्थात ही खरी अटक आहे की अटकेचे ‘नाटक’ आहे हे पाकिस्तान आणि त्या हाफिजलाच माहीत. मागील काही काळापासून हिंदुस्थानने हाफिज सईदसंदर्भात जागतिक पातळीवरून पाकिस्तानवर दबाव निर्माण केला होता. हाफिज याला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठीही प्रचंड प्रयत्न केले होते. पाकिस्तानात सत्ताधारी अथवा लष्करशहा कोणीही असला तरी हाफिज सईद, त्याच्या दहशतवादी संघटना आणि त्यामार्फत हिंदुस्थानवर होणारे जिहादी हल्ले याबाबतीत पाकिस्तानचे धोरण हाफिजच्या पारडयात वजन टाकणारेच राहिले आहे. कारण हाफिज सईदचा बोलविता धनी आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. यापूर्वीही हाफिजला स्थानबद्ध केल्याचे नाटक पाकड्यांनी केले होतेच, पण दोन्ही वेळेस त्याची मुक्तता करण्यात आली. त्यामुळे आता त्याला पुन्हा अटक झाली म्हणजे तो त्याच्या दहशतवादी संघटना आणि कारवाया संपल्या असे होणार नाही.
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठयावर असलेला पाकिस्तान सध्या देशोदेशी कटोरा पसरून भीक मागत फिरत आहे आणि दहशतवादाचा पोशिंदा ही त्या देशाची प्रतिमा त्याआड येत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर हाफिज सईदच्या अटकेचा बनाव घडवून आणला गेला आहे का? दहशतवादाविरोधात आपण कारवाई करीत आहोत यासाठी या अटकेची धूळफेक केली गेली आहे का? पाकिस्तान सरकारने हाफिजला अटक करायची आणि नंतर न्यायालयाने त्याला जामिनावर मोकळे करायचे या नाटकाचे ‘यशस्वी प्रयोग’ आतापर्यंत दोनदा केले गेले असल्याकडे या अग्रलेखात लक्ष वेधण्यात आले आहे.