पाचोरा पीपल्स बँकेत अपहार; माजी चेअरमनसह इतरांवर गुन्हे दाखल

FIR

पाचोरा प्रतिनिधी । येथील पाचोरा पीपल्स बँकेतील अपहार प्रकरणी संदीप महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी चेअरमनसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत संदीप दामोदर महाजन यांनी फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की, पाचोरा पीपल्स बँकेतील गैरव्यवहार हा आधीच चर्चेत असून ९ संचालकांनी याला कंटाळून राजीनामा दिला आहे. यामुळे बँकेवर सध्या प्रशासक असून याचे अंतर्गत परीक्षण सीए दिलीप बी. गांधी यांनी केलेले असून यातून हा गैरव्यवहार समोर आलेला आहे. या अपहारात प्रामुख्याने माजी चेअरमन अशोक हरकचंद संघवी, तत्कालीन सीईओ नितीन बी. टिल्लू व तत्कालीन लेखा परीक्षक बी.एस. फडणवीस अँड असोसिएट नाशिक यांचा प्रामुख्याने सहभाग असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, चेक डिस्काऊंटींग या प्रकारात तत्कालीन चेअरमन आणि इतरांनी अफरातफर केली आहे. आरबीआयच्या नियमानुसार चेक डिस्काऊंटींगला परवानगी नाही. तथापि, अशोक संघवी व नितीन टिल्लू यांनी इतरांना हाताशी धरून अशा प्रकारच्या चेकच्या माध्यमातून बनावट धनादेश सादर करून लाखो रूपये वापरल्याचे लेखा परिक्षणातून दिसून आले आहे. पाचोरा पीपल्सच्या एचडीएफसी बँकेतील खात्यावरून हा घोळ स्पष्टपणे दिसून येत आहे. खरं तर कोणत्याही चेकची वैधता तीन महिन्यांची असतांना चेक डिस्काऊंटींगच्या माध्यमातून संबंधीतांनी सहा ते सात महिन्यांपर्यंत लाखो रूपये वापरल्याचे दिसून आले आहे. यात प्रामुख्याने किशोर मशिनरी स्टोअर्स; अमोल पंडितराव शिंदे; सुराणा कृषी केंद्र; रोहित ज्वेलर्स; कल्पतरू एंटरप्रायजेस; सुयोग ट्रेडींग; नंदकिशोर श्रीधर सोनार; संघवी ज्वेलर्स; आनंद प्रेमचंद संघवी; सुयोग ट्रेडींग कंपनी आदी खातेधारकांच्या नावावर घोळ करण्यात आल्याचे दिसून आल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आलेला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, वरील खातेधारकांमधील मंडळी ही बँकेचे तत्कालीन चेअरमन आणि संचालकांचे निकटवर्तीय असल्याचे दिसून येत आहे. यामुळे १/४/२०१८ ते ९/११/२०१८ या कालखंडात तत्कालीन चेअरमन अशोक हरकचंद संघवी व संचालक किशोर हरीशचंद्र शिरूडे यांनी इतरांच्या मदतीने सुमारे ५५.३३ लाख रूपयांचा अपहार केला आहे. याशिवाय, फेब्रुवारी २०१९ पासून बँकेवर प्रशासक असतांनाही अशोक संघवी व नितीन टिल्लू यांनी सुधारणेच्या नावावर ठेकेदारांना मोठ्या रकमेची बिले अदा केली आहेत. यात खान खलीद रशीद; बोहरा पाईप; रतनलाल तोष्णीवाल; प्रशांत गोपीचंद बाविस्कर आणि जगन भिका माळी यांनी बिले प्रदान करण्यात आलेली आहेत. या सर्वांनी एकत्रीत पणे ३,५४,८५४ रूपये प्रदान केलेले आहेत. यात संघवी यांनी आपण आजही प्रमुख असल्याच्या भूमिकेतून बिले मंजूर करून अदा केल्याने हा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. याच्या जोडीला तत्कालीने चेअरमनचे भाऊ ब्रिजलाल हरकचंद संघवी आणि अन्य नातेवाईकांना वाढीव दराने व्याज प्रदान केले असून कर्जावर मात्र कमी आकारणी केलेली आहे.

दरम्यान, संदीप महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पिपल्स माजी चेअरमन अशोक संघवी यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर भाग ५ गु.र.नं २७२ /१९ भादवि ४०६,४०८,४०९,४२०,४६८,४७१,४४७अ सह १२०ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये शहरातील अनेक मातब्बरांचा समावेश असल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content