मुंबई प्रतिनिधी । मराठवाडा मुक्ती दिनाला दांडी मारणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर आज शिवसेनेने जोरदार हल्लाबोल करत ते संभाजीनगरातले निजाम असल्याची टीका केली आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. या प्रकारावरून आज शिवसेनेने सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून टिकेची झोड उठविली आहे. यात म्हटले आहे की, हिंदुस्थानला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले हे खरे, पण गोव्यात पोर्तुगीज व हैदराबादेतील निजाम स्वतंत्र हिंदुस्थान मानायला तयार नव्हते व त्यांनी स्वतःचे सवते सुभे राखण्यासाठी हिंदुस्थानविरुद्धच लढे उभारले. मात्र त्याविरुद्ध जनता रस्त्यावर उतरली व शेवटी दोन्ही प्रदेश १५ ऑगस्ट १९४७ नंतर स्वतंत्र झाले. अर्थात, आजही गोव्यात जसे पोर्तुगीज अवलादीचे शेपूट वळवळत आहे तशी मराठवाडा आणि हैदराबादेत निजामाची पिलावळ फूत्कार सोडीत आहे. ङ्गएमआयएमम पक्षाचे पुढारी मियाँ ओवेसी हे ऊठसूट संविधानावर हात ठेवून आम्ही कसे देशभक्त आहोत याचे खुलासे करीत असतात, पण ट्रिपल तलाक, समान नागरी कायदा, वंदे मातरम् म्हणण्यापासून मराठवाडा मुक्ती संग्रामापर्यंत त्यांच्या भूमिका ते देशभक्त असल्याचे सिद्ध करीत नाहीत. त्यांच्या पक्षाचे खासदार जलील हे मराठवाडा मुक्तिदिन सोहळ्यावर बहिष्कार टाकतात हे ओवेसी यांना मान्य आहे काय? एमआयएम हा निजामाचा वंश असेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे; कारण बनावट देशभक्तीचे त्यांचे ढोंग संभाजीनगरात उघडे पडले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, मराठवाड्याने औरंगजेबाला गाडले, निजामाला गुडघे टेकायला लावले. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही औरंग्या झाल्याशिवाय राहणार नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारकासमोर संभाजीनगरची जनताच तुम्हाला गुडघे टेकायला लावेल. आता शासनाने एक करावे, स्वातंत्र्य सेनानींचा हा असा अपमान करणाऱया खासदारास कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नये. देवेंद्रजी, काढा हा फतवा! महाराष्ट्रभूमीत अशा जलीलगिरीस थारा मिळता कामा नये! असे यात प्रतिपादन करण्यात आले आहे.