मुंबई प्रतिनिधी । केंद्र व राज्यात सत्तेत असणार्या भाजपने शेतकर्यांना केलेली मदत ही तुटपुंजी असल्याचा आरोप करून १०५ वाल्याचे बोलणे सावध व डोलणे बेसावध झाल्याचा जोरदार टोला आज शिवसेनेने लगावला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या सामनाच्या आजच्या अग्रलेखात भाजपला पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. शेतकर्यास नक्की काय मिळाले ? या शीर्षकाखालील अग्रलेखात भाजपला जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे. यात म्हटले आहे की, राज्यपालांनी खरीप पिकांसाठी ८ हजार आणि बागायतीस हेक्टरी १२ हजारांची मदत जाहीर करून शेतकर्यांचे संकट वाढवून ठेवले. पुन्हा त्यातही अटी, शर्ती वगैरेंचा रेटा आहे. सध्याचे शेतकर्यांवरील संकट हे अस्मानी आणि सुल्तानी असे दोन्ही प्रकारचे आहे. हेक्टरी आठ हजार रुपये मदत म्हणजे प्रतिगुंठा जेमतेम ८० रुपये मदत होते. एवढया कमी पैशात अवकाळीग्रस्त शेतकर्याचे नुकसान कसे भरून निघणार? पुन्हा या नुकसानीच्या पंचनाम्यांना मान्यता देण्यास विमा कंपनी नकार देत असल्याच्या तक्रारी आहेत. उशिरा होणारे पंचनामे विमा कंपनीने ग्राह्य धरले नाही तर अवकाळीग्रस्त शेतकर्याची अवस्था किती भयंकर होईल याची जाणीव सरकारी यंत्रणेला आहे का? असा प्रश्न यात विचारण्यात आला आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पिकलेलं धान्य विकणे तर दूरच, ते घरीही खाण्याच्या लायकीचे राहिलेले नाही अशा परिस्थितीत लेकरांना काय खाऊ घालायचे? रब्बीची पेरणी कशी करायची? जगायचे की मरायचे? असे अनेक प्रश्न राज्यातील ३५० तालुक्यांमधील एक कोटीपेक्षा जास्त शेतकर्यांच्या मनात थैमान घालीत आहेत. त्यांची ठोस उत्तरे देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आणि राज्याची सूत्रे ज्यांच्याकडे सध्या आहेत त्यांची आहे. स्वाभिमान गहाण वगैरे ठेवण्याची भाषा आता १०५ वाल्यांकडून होत आहे, पण ओल्या दुष्काळात उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांची पाठ वाकली असली तरी कणा मोडलेला नाही व या पाठकण्यांच्या आशीर्वादानेच आम्ही दिल्लीशी झगडा करीत आहोत. महाराष्ट्रातील शेतकर्यांना मिळालेली मदत तुटपुंजी असल्याची विधाने चंद्रकांतदादा पाटील वगैरेंनी केली याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण मग शेतकर्यास नक्की काय मिळाले? दिल्लीत व राजभवनात त्यांचेच राज्य आहे. तेव्हा या तुटपुंज्या मदतीचा निषेध म्हणून शेतकर्यांच्या स्वाभिमानाचा आवाज उठविण्याची हिंमत त्यांच्यात आहे काय हे आधी त्यांनी सांगावे. सध्या १०५ वाल्यांचे बोलणे सावध व डोलणे बेसावध बनले असल्याचा टोला या अग्रलेखातून मारण्यात आला आहे.