मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडले असले तरी आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार यांनी साद घातली आहे. या आघाडीचा काय परिणाम होईल हे गणित देखील त्यांनी उलगडून सांगितले आहे.
राज्यात एकनाथ शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. यात विशेष करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष आगामी काळात एकत्र राहणार की नाही ? याबाबत चर्चेला उधाण आलेले आहे. या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून उध्दव ठाकरे यांना सोबत राहण्याची साद घातली आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”अनेकजण मला बोलले की, ४० मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल.” अर्थात, आगामी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आघाडी करावी असे त्यांनी सुचविले आहे. आता याला उध्दव ठाकरे कसा प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.