मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या ‘हो’ ला ‘हो’ करता कामा नये, अन्यथा महाराष्ट्राचे तीन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आज शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सल्लावजा इशारा देतांनाच भाजपवर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे हे दिल्लीत शिवसेना फुटीचा, मराठी माणसांच्या एकजूट फोडीचा नजराणाच घेऊन जात असल्याने दिल्लीचे सरकार त्यांना काहीच कमी पडू देणार नाही. तसे वचन पहिल्याच दिवशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेच आहे. आरेचे जंगल तोडता येणार नाही, ते जंगल म्हणजे मुंबईचे फुप्फुस आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडली तर मुंबईचे लोक व जगभरातील पर्यावरणवादी मुख्यमंत्र्यांचे कौतुकच करतील. शिंदे यांनी वेगळा मार्ग त्यांच्या मर्जीने स्वीकारला असला तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कोणी कौतुक करीत असेल तर ते स्वीकारणारे ‘मन’ आमचे आहे, अशी टीका यात करण्यात आलेली आहे.
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे व त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असं कर्नाटकातील भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात. त्यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका. महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावध असावे असा सल्ला यातून देण्यात आला आहे.