फैजपुर, प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियान अंतर्गत रावेर यावल तालुक्यातील खोलवर गेलेली भूजल पातळीत वाढ करण्याच्या हेतूने दिनांक २४ ते २९ जुलै या कालावधीत यावल व रावेर तालुक्यातील प्रत्येक गावात शिवारफेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.
यावल व रावेर तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी स्वयंसहाय्यता गट प्रतिनिधी, तसेच जलशक्ती अभियान तालुका स्तरीय समिती मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व यंत्रणांचे प्रमुख, तसेच कृषी सहायक ग्रामसेवक यांचे समवेत शिवार फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी सांगितले. त्याचबरोबर शक्ती अभियानांतर्गत प्रत्येक गावात पाझर तलाव तयार करणे, रोपवाटीका तयार करणे, वृक्षलागवड करणे, नाला खोलीकरण व नाला दुरुस्ती गॅबियन बंधारे १०० विहिरींचे पुनर्भरण ,२०० ते १००० शोषखड्डे तयार करणे पहाडी भागात तयार करणे इत्यादी कामे घेण्यात येणार आहे. तरी प्रत्येक गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन जलशक्ती अभियान यशस्वी करण्यास हातभार लावावा व आपल्या गावात शिवारफेरी कोणत्या दिवशी आहे यासाठी गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रांतधिकारी डॉ अजित थोरबाले यांनी केलेले आहे.