डोंगर कठोरा येथे कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शिवार फेरी कार्यक्रम उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दिनांक १७ एप्रिल गुरुवारी सकाळी ८.३० वाजता शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनिल राणे व धनराज पाटील यांच्या शेतशिवारात हा कार्यक्रम पार पडला. या शिवार फेरीत श्रमदानातून बांधचर खोदणे, माती परीक्षण, विहीर मोजणी यासारखे उपक्रम राबविण्यात आले. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी होत शासनाच्या योजनांचा लाभ घेतला.

कार्यक्रमात जिल्हा सूक्ष्म नियोजन समन्वयक तुषार देसाई, कृषी पर्यवेक्षक एन.जी. पाटील, कृषी सहाय्यक आर.बी. पवार यांनी माती परीक्षण कसे करावे, त्याचे फायदे, खर्च, तसेच विहीर मोजणीची प्रक्रिया याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील, ग्रामविकास अधिकारी ए.टी. बगाडे, ग्रामपंचायत सदस्या कल्पना राणे, तसेच डोंगर कठोरा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये डिगंबर खडसे, शरद राणे, सुरेश झांबरे, प्रदीप पाटील, भोजराज पाटील, रामा पाटील, सतीश जावळे, प्रकाश राणे, मिलिंद महाजन, प्रवीण पाटील, सायबू तडवी, सुधाकर वराडे, खेमा पाटील, कीर्ती महाजन, हर्षदा कोलते, ज्योती कोलते, हुमाबाई तडवी आदींचा समावेश होता.

या उपक्रमांतर्गत संध्याकाळी ५ वाजता महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून, पुढील २१ एप्रिल २०२५ पर्यंत विविध उपक्रम जसे की श्रमदान, शिवार फेरी, माती परीक्षण, विहीर तपासणी यांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या लोकोपयोगी योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक एन.जी. पाटील, कृषी सहाय्यक आर.बी. पवार आणि सविता पवार यांनी केले आहे. शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेती, जलसंधारण, व नैसर्गिक स्रोतांचे जतन यासंबंधी जनजागृती करण्यात आली असून, हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरतो आहे.

Protected Content