शिवजयंतीनिमित्त चौथीच्या शिवछत्रपती पुस्तकाची अभिवाचन स्पर्धा

भुसावळ प्रतिनिधी । येथील मराठा समाज मंडळ भुसावळ शहर व तालुका यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा 2021 आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती पुस्तकाची होणार असून त्यात भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीचे औचित्य साधून शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा 2021 आयोजित करण्यात आली आहे. प्रथम गट पाचवी ते आठवी असून द्वितीय गट नववी ते बारावी आहे. ही स्पर्धा मंगळवार, दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजता म्युनिसिपल हायस्कूल, जामनेर रोड, भुसावळ येथे होईल. अभिवाचनासाठी इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकाचा वापर करावा. शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका पाठाची निवड करावी. एका विद्यार्थ्याला एका पाठाचे अभिवाचन पूर्ण होईपर्यंत वेळ दिला जाईल. पाठाचे अभिवाचन करायचे असल्याने पाठांतर करण्याची गरज नाही. इयत्ता चौथीचे शिवछत्रपती हे पाठ्यपुस्तक उपलब्ध होत नसल्यास 8149498020 या व्हाट्सअप क्रमांकावर पुस्तक पाठवा असा मेसेज करावा. त्यानंतर पाठ्यपुस्तक पाठवले जाईल. 

अभिवाचन परीक्षणाचे काम सुजाण परीक्षक करणार असून त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती समारंभ दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी बक्षीस वितरण केले जाईल. स्पर्धेत सहभागासाठी डी. के. पाटील 9403731368 या व्हाट्सअप क्रमांकावर विद्यार्थ्याचे नाव, शाळा व इयत्ता अशी माहिती पाठवावी. भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन मराठा समाज अध्यक्ष किरण पाटील व गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी केले आहे. 

असे करावे अभिवाचन – 

अभिवाचन हे वाचनाची पुढील पायरी आहे. जो पाठ्यउतारा आपण वाचणार आहोत, तो आधी समजून घेतला पाहिजे. केवळ वाचन म्हणजे अभिवाचन नसून शब्दाला सजीव करून त्यात प्राण फुंकणे म्हणजे अभिवाचन होय. अभिवाचनात पाठ्यउतारा आणि कायिक व वाचिक अभिनय यांचा सुंदर संगम व्हायला हवा. अभिवाचनातून पाठ्यउताऱ्यातील कथा, भावार्थ, त्यातील घटना, व्यक्तिमत्व जिवंत करून श्रोत्यांसमोर ते चित्र साकार होणे अपेक्षित असते. त्यासाठी अतिशय स्पष्ट उच्चार, आवश्यक ती लय, अर्धविराम- स्वल्पविराम-पूर्णविराम यासह सर्व विरामचिन्हांचा योग्य वापर, शब्दांवरील जोर, आवाजातील योग्य तो चढ-उतार, वाचनाची गती, चेहऱ्यावरील हावभाव या सर्व सादरीकरण कौशल्यांचा समर्पक वापर करून पाठ्यउताऱ्याची सुंदर अनुभूती श्रोत्यांना अभिवाचनातून देता येते.

 

Protected Content