आठवडे बाजारातील दुर्गंधी व अस्वच्छतेवर शिवसेनेचा प्रभावी हस्तक्षेप; प्रशासनाची तात्काळ कारवाई


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील आठवडे बाजारात व्यापारी व नागरिकांना भेडसावणाऱ्या दुर्गंधी व अस्वच्छतेच्या समस्येवर शिवसेनेच्या पुढाकाराने तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यावल नगरपालिकेला निवेदन देत बाजारात असलेल्या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधले, ज्यामुळे प्रशासन हालचालीत आले आणि तत्काळ सफाई मोहिम राबविण्यात आली.

शुक्रवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. घाण, दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे विशेषतः महिला व वयोवृद्ध प्रवाशांचा त्रास वाढला होता. या संदर्भात नागरिकांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या त्यांच्या कानावर घातल्या. तातडीने कारवाई करत शिवसेनेच्या वतीने यावल नगरपालिकेला निवेदन सादर करण्यात आले.

शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार, युवा शाखा प्रमुख अजय तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांची भेट घेऊन समस्येची गंभीरता सांगितली. त्यांनी या प्रश्नांची तात्काळ दखल घेतली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाला घटनास्थळी पाठवले. त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून लगेचच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

त्या दिवशीच आठवडे बाजाराचा परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांनी यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विशेषतः युवानेते अजय तायडे व जिल्हा पदाधिकारी नितीन सोनार यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी जेवढ्या तत्परतेने प्रशासनाला जागे केले, ते पाहता नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.