मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या सहा जागांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मुदत दोन दिवसावर आली आहे. शिवसेनेच्या दोन राष्ट्रवादीचे एक उमेदवार जाहीर झालेत. मात्र भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका जागेवर अजून उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही.
राज्यसभेच्या होणाऱ्या ६ जागांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठीची ३१ मे मुदत आहे. गेल्या चार दिवसापूर्वीच शिवसेनेच्या खा. संजय राऊत आणि कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार या दोघांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे उद्या अर्ज दाखल करतील. मात्र राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत जवळ जवळ आली असली तरी एका जागेसाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.
पक्षसंघटना वाढविण्यासाठी राज्यातील नेतृत्वाला उमेदवारी मिळणार कि नेहमीप्रमाणे ऐनवेळी बाहेरच्या राज्यातील नेत्याला उमेदवारी देणार, याची चर्चा पक्षात सुरू असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कोट्यातील जागेसाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेसचेच मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. याबाबत उशिराने निर्णय होत असल्यामुळे चुकीचा संदेश जात असल्याचेही काहीं पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे राज्यात भाजपचे आणि सह्योगी घटक असे ११३ आमदारांचे संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाणार आहेत. एक सदस्य निवडीसाठी किमान ४१ मते आवश्यक आहेत. त्यानुसार दोन सदस्य निवडून सुद्धा बरीच मते शिल्लक राहतात. असे असले तरी भाजपनेसुद्धा या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर केले नसून, आज, रविवारी ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.