राष्ट्रवादीसोबत वादामुळे शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा

 

परभणी । राष्ट्रवादी काँग्रेससोबत ताळमेळ जुळत नसल्याच्या कारणावरून शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यातून महाविकास आघाडीतील वाद पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहेत.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील विरोध अजूनही कायम असल्याचे आज पुन्हा अधोरेखीत झाले आहे. शिवसेनेचे परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी राष्ट्रवादी सोबतच्या वादाच्या कारणातून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत यापूर्वी आधी प्रचंड विरोध होता़ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी जमवून घेतले होते़ असे असले तरी अजून स्थानिक पातळीवर पूर्णपणे दिलजमाई झालेली नाही. अशातच जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे वितरण, विविध अशासकीय समित्यांवरील नियुक्ती आदींच्या कारणावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुही निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे़ या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात गळचेपी होत असल्याच्या कारणावरून बंडू जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

बंडू जाधव यांचा राष्ट्रवादीसोबत जिंतूर बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यावरून वाद झाला होता. येथे राष्ट्रवादीचा प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. तसेच जिल्हास्तरावरील अशासकीय समित्यावर सदस्यांची नियुक्ती करण्यावरूनही खा़ जाधव यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते़ तसेच राष्ट्रवादीचा आमदार नसलेल्या मतदारसंघातही शिवसेनेला विचारात घेतले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे असल्याचे समजते़

Protected Content