भुसावळात उबाठा शिवसेना निष्ठावंतांचा मेळावा उत्साहात

0
145


भुसावळ–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) निष्ठावंतांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करणे, निष्ठावंत कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि लढाईसाठी सज्जतेचा संदेश देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

रामानंद पॅलेस सभागृहात झालेल्या या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अॅड. चंद्रकांत शर्मा, जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील आदींसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

मेळाव्यात पक्षाच्या धोरणांवर, संघटनात्मक बांधणीवर आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “भुसावळ नगरपालिकेच्या ५० जागांवर लढण्यासाठी तयारी सुरू ठेवावी. सन्मानजनक जागा मिळाल्यास आघाडीबाबत विचार होईल, पण त्याची वाट न पाहता शिवसेना स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवेल.” त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले की शिवसेना (उबाठा) नगराध्यक्ष पद निवडून आणण्यास निर्णायक ठरेल.

गुलाबराव वाघ पुढे म्हणाले की, “इतिहासातील बाजीप्रभू देशपांडेप्रमाणेच भुसावळच्या खिंडीसाठी लढणारे सैनिक म्हणजे आपले शिवसैनिक आहेत. नवीन जिल्हाप्रमुख अॅड. चंद्रकांत शर्मा यांची नियुक्ती विजयासाठी झाली आहे. विजयाची पताका फडकविल्याशिवाय शांत बसायचे नाही.” यावेळी शहराच्या वतीने अॅड. शर्मा यांचा चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, तालुकाप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख गणेश चौधरी, शहरप्रमुख शेख मकबूल, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, मुकेश गुंजाळ, बाळासाहेब भोई, तसेच पल्लवी जैन, उमाकांत शर्मा (नमा), राकेश खरारे, अरुण सालुंखे, शरद जैसवाल, जवाहर गौर, मिलिंद कापडे, समाधान भोई, शेख अब्बास यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. उत्तमराव सुरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमाकांत शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

मेळाव्याच्या शेवटी जयघोष आणि शिवसेना घोषणांनी सभागृह दणाणून गेले. निष्ठा, संघटितपणा आणि लढाऊ वृत्तीचा संदेश देत हा मेळावा कार्यकर्त्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण करून गेला.