Home Cities जळगाव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना उबाठाचा सरकारला अल्टिमेटम !

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना उबाठाचा सरकारला अल्टिमेटम !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात ५ आणि ६ मे रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर केळी पिकांचे नुकसान झाले आहे. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केळीच्या झाडांच्या मुळांवर परिणाम झाला असून, अनेक झाडांची वाढ थांबून त्यांना फळधारणेची क्षमता उरलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अप्रत्यक्ष पण दीर्घकालीन नुकसानही भरपाई योग्य मानावे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी केली आहे.

सोनवणे यांनी सांगितले की, तत्कालीन कृषीमंत्री दादा भुसे व खासदार उमेश दादा पाटील यांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या नुकसानीचा आढावा घेऊन शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानुसार, वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानालाही पात्र शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे आता देखील विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्वरित लक्ष घालावे व हेक्टरी किमान ८५,००० रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्याचबरोबर, पंचनामे प्रक्रिया अडथळ्यात सापडली आहे, कारण कृषी विभागाचे अधिकारी सध्या आंदोलनात आहेत, त्यांच्या ऑनलाइन कामकाजावर परिणाम झाला असून, याचा ताण कृषी सहाय्यकांवर येत आहे. याच तणावामुळे सिल्लोड तालुक्यातील एका कृषी सहाय्यकाने आत्महत्या केली आहे. हे आंदोलन तातडीने थांबवावे व कृषी सहाय्यकांची भरती करून पंचनामे सुरळीत पार पडावेत, अशीही मागणी केली गेली.

“शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांत नुकसान भरपाई मिळावी. ३१ मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा न झाल्यास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound