जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्वतः समुपदेशन घेऊन शुक्रवारी ९ मे रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीत २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती दिली.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. सीईओ मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर या प्रलंबित पदोन्नत्या आणि इतर महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेतला होता. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत पदोन्नतीचे प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात सीईओ मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत २१ आरोग्य सेवकांना त्यांच्या मागणीनुसार रिक्त असलेल्या ठिकाणी आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारीही उपस्थित होते. सीईओ मिनल करनवाल यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘हि दिवाळी नविन घरी’ या महत्त्वाकांक्षी योजनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.