धरणगाव (प्रतिनिधी) लोकनियुक्त नगराध्यक्ष सलिम पटेल यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. पालिकेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस शिवसेनेतच दिसून येत आहे. या वृत्तातून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या जमेच्या बाजू आम्ही येथे वाचकांसाठी देत आहोत.
धरणगाव नगरपालिकेत आजच्या घडीला १४ नगरसेवक शिवसेनेचे तर ६ नगरसेवक भाजपचे आहेत. थोडक्यात पालिकेत शिवसेनेचे स्पष्ट बहुमत आहे. दुसरीकडे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना मिळणारे संभाव्य मंत्रीपद लक्षात घेता, शिवसेनेतच उमेदवारी सर्वाधिक चुरस बघायावास मिळत आहे. गतवेळी शिवसेनेकडून स्व.सलीम पटेल व युवा उद्योजक निलेश चौधरी हे दोघं जण लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी स्पर्धेत होते. परंतू ऐनवेळी पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळत निलेश चौधरी यांनी माघार घेतली होती. यापूर्वीही निलेश चौधरी यांचे वडील माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांनी पक्षाच्या आदेशानुसार दोन वेळेस माघार घेतलेली आहे. त्यामुळे यावेळी त्यांचा दावा मजबूत आहे. निलेश चौधरी हे युवानेतृत्व असून त्यांना सहकार व व्यापारी क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. तसेच जिनिंग व्यवसायाच्या माध्यामतून धरणगाव शहरातील शेकडो तरुणांना त्यांनी रोजगार दिला आहे. त्याचपद्धतीने पालिका निवडणूकीसाठी आवश्यक असणारी आर्थिक कुवत देखील निलेश चौधरी चांगल्या प्रकारे राखून आहेत. पालिका निवडणूक असो की, विधानसभा पक्षाला चौधरी यांच्या समूहाकडून मोठी मदत शिवसेनाला होत असते. एकंदरीत सगळ्या बाजूंनी विचार करता, निलेश चौधरी हे शिवसेनेच्या दृष्टीने एक दमदार उमेदवार ठरू शकतात.
दुसरीकडे गतवेळी निवडणुकीत सर्वात महत्वाची जबाबदारी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी निभावली होती. अगदी प्रत्येक वार्डातील उमेदवार कसा निवडून येईल? याचे अचूक नियोजन त्यांनी आखले होते. एवढेच काय तर माळी समाजाचे दोन-तीन उमेदवार असतांना देखील श्री. वाघ यांचे वास्तव्य असलेल्या माळी बहुसंख्य असणाऱ्या प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनाचा उमेदवाराला मोठा लीड होता. वाघ यांच्या सूक्ष्म नियोजनामुळेच पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक १५ नगरसेवक निवडून आले होते. त्याच पद्धतीने गुलाबराव वाघ यांनीच सर्वात आधी महाविकासआघाडीची साद धरणगावसह जिल्ह्यात घातली आहे. वाघ यांच्या सौभाग्यवती उषाताई वाघ ह्या नगराध्यक्ष असतांना शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली होती. प्रशासनासह संघटनेवरही त्यांची पकडही मजबूत आहे. विशेष म्हणजे गुलाबराव वाघ हे लोकसभेसाठी इच्छुक होते. परंतू युती झाल्यामुळे उमेदवारी भाजपकडे गेली. वास्तविक बघता शिवसेनेतील त्यांचे कार्य आणि अनुभव बघता यावेळी वाघ यांचा विचार विधानपरिषदसाठी होऊ शकतो किंवा एखादं महामंडळ मिळणे तर निश्चीत मानले जात आहे. त्यामुळे ते पुन्हा पालिका निवडणुकीसाठी इच्छुक राहतील का? हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
शिवसेना पालिका गटनेते विनय (पप्पू) भावे हे देखील शिवसेनेचे उमेदवार ठरू शकतात. पप्पू भावे यांची देखील संघटनेवर चांगली पकड आहे. पालिकेतील कारभाराचाही त्यांना चांगला अनुभव आहे. त्याच पद्धतीने गरिबांना सढळ हाताने मदत करण्याच्या स्वभावामुळे ते शहरातील कानाकोपऱ्यात परिचित आहेत. वैद्यकीय अडचणीत असलेल्या अनेकां ते नेहमी मोठी आर्थिक मदत करत असतात. सर्वात महत्वाचे ‘पांडव ग्रुप’चे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. आर्थिक बाबीतही ते सक्षम आहेत. तर सहकारी नगरसेवकांना सांभाळून घेण्याचेही कौशल्य त्यांच्यात आहेत. शहरातील छोट्या-मोठ्या समाजातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत त्याचे सलोख्याचे संबंध आहेत. महाविकासआघाडीचा फंडा यशस्वी झाल्यास त्यांना कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडूनही समर्थन मिळू शकते. शहराच्या राजकारणाची खडानखडा माहिती असल्यामुळे कोणत्या प्रभागात कुणाला जवळ करायचे किंवा दूर ठेवायचे याची पूर्ण कल्पना भावे यांना आहे. आपल्या स्वभावामुळे त्यांच्या व्यायक्तिक मैत्रीचा गोतावळा देखील खूप मोठा आहे. त्यामुळे भावे हे देखील शिवसेनेच्या दृष्टीने एक सक्षम उमेदवार ठरू शकतात.
शिवसेनेचे शहरअध्यक्ष राजू महाजन यांचे नाव देखील ऐनवेळी समोर येऊ शकते. महाजन हे अनेक वर्षापासून शिवसेनेत आहेत. शिवसेना वाढविण्यात आणि निवडणुका जिंकवण्यात पडद्याआडून त्यांनी अनेकवेळा महत्वपूर्ण भूमिका निभावाली आहे. निवडणूकीसाठी नियोजनात आखण्यात महाजन यांचा हातखंडा आहे. तसेच ते आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून राजू महाजन यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक वासुदेव चौधरी हे देखील उमेदवारीसाठी योग्य उमेदवार ठरू शकतात. सामाजिक गणित तसेच सर्वपक्षात मैत्रीपूर्ण संबंध चौधरी यांच्या जमेच्या बाजू आहेत. परंतू तूर्त चौधरी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत का? हे स्पष्ट नाहीय.
शिवसेनेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.सलीम पटेल यांचे ज्येष्ठ चिरंजीव तौसीफ पटेल यांच्या नावावरही विचार केला जाऊ शकतो. शिवसेना पक्षश्रेष्ठी मतदारांमधून सहानभूतीची लाट मिळवण्यासाठी तौसीफ पटेल यांच्या नावाचा विचार करू शकते. तौसीफ पटेल हे देखील संघटनेत सक्रीय आहेत. स्व.सलीमभाई यांची प्रकृती खराब असतांना त्यांनीच शहरातील विकासकामांकडे लक्ष दिले होते. अगदी अल्पवधीत तौसीफ पटेल हे संघटनेत आपल्या वडिलांप्रमाणे लोकप्रिय झाले आहेत. उच्चशिक्षित तथा तरुण चेहरा म्हणून शिवसेना त्यांचाही विचार करू शकते. अर्थात तौफीस पटेल हे निवडणूक लढण्यास होकार देतील का? यावरच पुढील गणितं अवलंबून राहणार आहेत.