नंदुरबार प्रतिनिधी । येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार टक्कर झाली असून आता शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असेल हे स्पष्ट झाले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून, एकूण ५६ जागा असलेल्या जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. प्रत्येकी २३ जागा जिंकत भाजपा आणि काँग्रेस सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. तर शिवसेनेला ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र गेल्या वेळी केवळ एक जागा जिंकणार्या भाजपाने २३ जागा जिंकत यावेळी जोरदार मुसंडी मारली आहे. २०१३ मध्ये झालेल्या नंदुरबारच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने २९ तर राष्ट्रवादी काँग्रेसने २५ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ एक जागा जिंकता आली होती. आता मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीची पीछेहाट झाली असून शिवसेना किंगमेकर ठरल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे दोन्ही पुत्र अजित नाईक व दिपक नाईक; माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या कन्या अॅड. सिमा वळवी; शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र अभिजीत पाटील; माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी आणि सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील हे सर्व विजयी झाल्या आहेत. तर आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी; काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ. भगवान पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे.