आता ओबीसी समुदायाचाही मोर्चाचा इशारा

 

मुंबई: वृत्तसंस्था । खासदार संभाजी छत्रपती महाराज यांनी 16 जून रोजी मराठा मोर्चाची हाक दिलेली असतानाच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी 15 जून रोजी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे.

 

आता  राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शेंडगे यांनी मोर्चाची हाक दिल्याने या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींकडे मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणासह ओबीसींच्या आरक्षणावरही चर्चा केली. त्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे. एक डेडिटकेटेड आयोग नेमून ओबीसींचा डाटा गोळा करावा. त्यानंतर हा डाटा सुप्रीम कोर्टाला सादर करावा. तरच ओबीसींचे आरक्षण टिकेल. सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही तर येत्या 15 तारखेला ओबीसी समाज रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करेल. याची जबाबदारी सरकारचीच असेल, असा इशारा शेंडगे यांनी दिला.

 

संभाजीराजेंनीही रायगडावरून मराठा आंदोलनाची घोषणा केली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला होता.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल पंतप्रधानांना भेटले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या भेटीची माहिती दिली. या भेटीत मराठा आरक्षणापासून ते अगदी मुंबई मेट्रोसाठी कांजूरमार्गच्या जागेपर्यंत आणि जीएसटीचा परतावा, पिक विमा, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतरची मदत, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भेटीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी भेटीचा तपशील माध्यमांसमोर मांडला

 

Protected Content