कोरोना काळात शिवसेनेने सर्वाधीक जनहिताचे केले काम ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील

महानगर शिवसेनेतर्फे रूग्णवाहिका चालक व सफाई कर्मचार्‍यांना विमा प्रदान

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीचा प्रतिकार हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली करण्यात आला असून समाजाच्या तळागाळातील रूग्णांना शिवसेनेने सर्वाधीक मदत केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. महानगर शिवसेनेतर्फे खासगी रूग्णवाहिकेचे चालक आणि सफाई कर्मचार्‍यांना एक वर्षाचा विमा प्रदान करण्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, शिवसेना महानगर उपप्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून आज जिल्ह्यातील खासगी रूग्णवाहिकेचे चालक व त्यांचे सहकारी तसेच सफाई कामगारांचा एक वर्षाचा आरोग्य विमा काढण्यात आला. आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत विमा प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कुणाल दराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या आपत्तीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्याचे अतिशय समर्थपणे नेतृत्व केले. अगदी साध्या नगरसेवकपदाचाही अनुभव नसतांना थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या साहेबांनी कोरोनाच्या आपत्तीचा यशस्वी प्रतिकार केला. तर दुसरीकडे कोरोनाच्या लाटेचा प्रतिकार करतांना सर्वसामान्य शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणात झटले. राज्यात कोणत्या एका राजकीय पक्षाने सर्वाधीक मदत केली असेल तर तो शिवसेना होय…! आमच्या शिवसैनिकाने थेट ग्राऊंड लेव्हलवरून मदत केली. आज जळगाव जिल्ह्यात सर्वाधीक १७ रूग्णवाहिका या शिवसेना पक्षाकडेच असल्याचे नमूद करत पालकमंत्री म्हणाले की, कार्यकर्त्यांनी नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून समाजसेवा करायला हवी. प्रशांत सुरळकर यांना रूग्णवाहिका चालक आणि सफाई कर्मचार्‍यांचा विमा काढण्याची संकल्पनादेखील नाविन्यपूर्ण असल्याचे कौतुक पालकमंत्र्यांनी केले.

आमदार कुणाल दराडे यांनी म्हटले की, कोरोना काळात योध्ये हेच खरे देवदूत असून शासनाच्या व शिवसेनेचे कार्य  तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे आव्हान केले.यावेळी जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर विष्णुभाऊ भंगाळे यांनी सांगितले की, शिवसंपर्क अभियानाच्या  माध्यमातून विविध समाजपयोगी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला, कोरोना योध्याच्या विमा कवच उपक्रमाचे  उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, आमदार कुणाल दराडे, जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्रीताई महाजन, सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विस्तारक अजिंक्य चुंबळे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक, डी पी डी सी सदस्य श्याम कोगटा, विस्तारक किशोर भोसले यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडी च्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उपशहर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी कोरोना योध्याना विमा कवच बाबत माहिती विशद केली. सूत्रसंचालन शाखा प्रमुख जय वर्धने यांनी तर आभार युवराज विभाग प्रमुख गालफडे यांनी मानले.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!