फैजपूर, प्रतिनिधी | येथील शिवसेनेचे नगरसेवक अमोल निंबाळे व माजी नगरसेवक मनोज कापडे यांनी काल (दि.२३) पासुन नगरपालिका कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आज (दि.२४) सायंकाळी मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी पत्रामुळे मागे घेण्यात आले आहे.
शिवसेना नगरसेवक अमोल निंबाळे व माजी नगरसेवक तथा नगरसेविका पती मनोज कापडे यांनी काल पासुन पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. पालिकेकडून पालिका हद्दीतील भुसावळ रोड, शिवकॉलनी व शिवाजी नगर येथे खुल्या जागेत जागा स्वच्छ करून तारेचे कंपाऊंड व वृक्ष लावून हरित पट्टा विकसित करत असतांना संबंधित ठेकेदाराने जागा स्वच्छ न करता निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. इतकेच नव्हे तर झालेले कामाचे रनींग मीटर तारेचे कंपाउंड व केलेले काम हे जादा वृक्षारोपण दाखवून ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले. यामुळे संबंधित हरित पट्टा वृक्षारोपण मध्ये निधीचा दुरूपयोग केला असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडेही केली आहे.
या उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी आज सायंकाळी उपोषणार्थीची भेट घेतली. त्यांनी लेखी पत्र देवून हरितपट्टा कामाबाबत पंचनामा करून दि ६ जानेवारी२०२० फैजपूर पालिकेकडे कायमस्वरूपी अभियंता नसल्याने पंचनामास वेळ लागणार आहे. प्रभारी कनिष्ठ अभियंता गुरुवारी कार्यालयात उपलब्ध झाल्यावर प्रत्यक्ष पंचनाम्यास सुरुवात होईल. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास अहवाल देण्यात येईल, तोपर्यंत सदर जागेचे गेट सील करण्यात येत आहे. तरी उपोषण मागे घ्यावे, असे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.