जळगाव प्रतिनिधी । स्काय डायव्हींगमध्ये एकामागून एक विक्रम प्रस्थापित करणार्या खान्देश कन्या शीतल महाजन यांनी आता आपले पती वैभव राणे आणि वृषभ व वैष्णव या दहा वर्षांच्या जुळ्या मुलांसह आकाशातून उडी घेऊन पुन्हा एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
पतीदेखील स्काय डायव्हर
मूळच्या आसोदा येथील रहिवासी तथा कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पणती शीतल महाजन यांना आता कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. त्यांच्या नावावर स्काय डायव्हींगमधील अनेक जागतिक विक्रम नोंदविण्यात आले आहेत. यासोबत वैयक्तीक जीवनातही त्यांनी आपल्या छंदाशी सुसंगत अशा बाबींचा अवलंब केला आहे. यात प्रामुख्याने त्यांनी आपला विवाह हादेखील हॉट एयर बलूनच्या माध्यमातून हवेत झाला होता. याला प्रसारमाध्यमांनी ठळक प्रसिध्दीदेखील दिली होती. त्यांचे पती वैभव राणे हे फिनलँडमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असून आपल्या पत्नीसोबत त्यांनीही स्काय डायव्हींग शिकून घेतली आहे. याहूनही सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांचे नुकताच दहावा वाढदिवस साजरे केलेले जुळे वृषभ आणि वैष्णव यांनीही आपल्या माता-पित्याचा कित्ता गिरवला आहे. यातूनच नवीन विक्रम आकारास आला.
अॅडमस्टरडममध्ये घेतली उडी
शीतल महाजन यांनी आपले पती वैभव राणे आणि मुले वृषभ व वैष्णव यांच्यासह फिनलँडमधील अॅमस्टरडॅम शहरात सुपर कारवान एयरक्राफ्ट २०६ या विमानातून तब्बल १३ हजार फुट उंचीवरून स्काय डायव्हींग केले. एवढ्या उंचीवरून स्काय डायव्हींग करून हे चारही जण जमीनीवर अगदी सुखरूपपणे उतरले. आजवर शीतल महाजन यांनी ७४० वेळेस तर वैभव राणे यांनी ५८ वेळेस अवकाशातून उडी घेतली आहे. तर आता त्यांची मुले वृषभ व वैष्णव यांनीही या क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांच्या नावावर सर्वात कमी वयात उडी घेण्याचा विक्रम नोंदला गेला आहे. तर कुटुंबासह उडी घेणार्या शीतल महाजन व त्यांच्या कुटुंबाच्या नावावरही नवीन विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे.
आकांक्षेपुढे गगन ठेंगणे
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील शीतल महाजन यांनी अल्प वयात गाठलेले यशोशिखर हे कुणासाठीही अत्यंत प्रेरणादायी असेच आहे. वयाच्या २२व्या वर्षी २००४ साली त्यांनी उणे ३७ अंश तापमानात उत्तर धु्रवावर त्यांनी रशियन एमआय ८ या हेलीकॉप्टरमधून उडी घेऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी कोणत्याही प्रकारचा सराव केलेला नव्हता. तेव्हापासून त्यांनी आजवर मागे वळून पाहिले नाही. त्यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून त्या मोटीव्हेशनल स्पीकर म्हणूनदेखील ख्यात आहेत. लवकरच जगातील सर्वात मोठे शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट आणि सात आश्चर्यांपैकी एक असणार्या ताज महालाच्या परिसरात आकाशातून उडी घेण्याचा शीतल महाजन यांचा मानस आहे.