मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांवर दाखल केलेल्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आज निकाल देत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला असून यामुळे उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणार्या घटनेचा निकाल नेमका काय लागणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. २० जून २०२२ रोजी राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा सदस्यांसाठी निवडणूक झाली. रात्री याचा निकाल लागताच मोठ्या घडामोडी घडल्या. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील ४० सहकार्यांना घेऊन आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी शहरातील हॉटेमध्ये दाखल झाल्याचे वृत्त येताच राज्यात चर्चेला उधाण आले. यानंतर तात्काळ उध्दव ठाकरे गटाने शिंदे गटाविरूध्द तर शिंदे गटाने ठाकरेंच्या सहकार्यांच्या विरोधात धाव घेतली. यानंतर राज्यात सत्तांतर होऊन नाट्यमय घटनांच्या नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल असा निकाल दिला. यासोबत उध्दव ठाकरे यांच्या गटाने शिंदे यांच्याकडील १६ सदस्यांना अपात्र करण्यात यावे असा निकाल दिला. तर, शिंदे यांच्या गटाने देखील ठाकरे गटाचे १४ सदस्य अपात्र करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, यावर न्यायालयात सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाने सदस्यांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर हे निर्णय घेतील असे निर्देश दिले. नार्वेकरांनी या प्रकरणात तात्काळ कार्यवाही न केल्याने ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारत ३१ डिसेंबर पर्यंत निर्णय घेण्याचे सांगितले. तथापि, त्यांनी मुदत वाढून मागितली. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी १० जानेवारी २०२४ पर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने आज विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी निकाल दिला.
सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये राहूल नार्वेकर यांनी निकाल वाचण्यास प्रारंभ केला. त्यांनी या खटल्यातील सर्व तपशील उलगडून सांगितले. त्यांनी प्रारंभी या खटल्याची पार्श्वभूमि सांगितली. यानंतर त्यांनी शिवसेना नेमकी कुणाची आणि अपात्रतेवर आपल्यालाच नियमानुसार निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शिवसेनेने १९९९ साली निवडणूक आयोगाकडे आपली घटना सादर केली असून हीच मूळ घटना आहे. या घटनेनुसार २३ जानेवारी २०१८ रोजी निवडणूक घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. तर २००९ साली पक्षात प्रमुख हे पद सर्वोच्च होते. तर २०२८ साली पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च असल्याचे दाखविण्यात आले. यामुळे २०१८ सालची पदरचना वैध धरता येत नसल्याचे राहूल नार्वेकर म्हणाले. याचमुळे उध्दव ठाकरे हे पक्षातून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करू शकत नाही. यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची परवानगी आवश्यक असतांना तसे करण्यात आले नाही याकडे नार्वेकर यांनी लक्ष वेधून घेतले.
राहूल नार्वेकर पुढे म्हणाले की, २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत फुट पडली. तर फुट पडल्याचे पुढील दिवशी म्हणजे २२ जून २०२२ रोजी स्पष्ट झाले. यानंतर विस्तृत विवेचन करत त्यांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला. यानंतर त्यांनी अपात्रतेबाबत विवेचन सुरू केले. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. यामुळे शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाला दिलासा मिळाला असून ठाकरेंना मात्र जबर धक्का बसला आहे.