पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील ग्रामविकास व पाणीटंचाई निवारण समितीने यावर्षी उन्हाळ्यात मार्च ते मे महिन्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई असताना लोकसहभागातून ५० फूट रुंद २२ फूट उंच व ५०० फूट लांब असा मोठा बांध तयार केला होता. आता त्यात पावसाचे पाणी साचून तो बांधारा पाण्याने तुडुंब भरलेला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात या गावाचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात एप्रिल ते मे महिन्यात त्या ठिकाणी एकही थेंब पाणी नसताना तीन कि.मी. अंतरावरील कंकराज धरणातून संदीप एकनाथ पाटील यांच्या खाजगी पाईपलाईनद्वारे व पं.स. विस्ताराधिकारी सुनील अमृतराव पाटील तसेच ग.स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील व संचालक विलास नेरकर यांनी १०० पीव्हीसीचे पाईप दिले होते, त्याद्वारे पाणी आणून गावाची पाण्याची समस्या सोडवण्यात आली होती. या कामासाठी अनिल भाईदास पाटील व शिरसोदे गटाच्या जि.प. सदस्य रत्नाबाई रोहीदास पाटील यांचेही अनमोल सहकार्य लाभले होते. तसेच गावातील प्रकाश भिकन पाटील यांनी आपल्या जेसीबी व ट्रॅक्टरद्वारे कमी दरात खूप मोठे काम करून दिले व गावाबद्दल आपली बांधीलकी जपली होती.
तेथील ग्रामविकास व पाणीटंचाई निवारण समितीमध्ये गावातील शिक्षक निवृत्त ग्रामसेवक जि.प. कर्मचारी तसेच गावातील शेतकरी व तरुण समाजसेवक सहभागी आहेत. विशेष म्हणजे या समितीत राजकारणी व पदाधिकारी कोणीच नाहीत. सर्व ग्रामस्थांनी मिळून पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवली असून गाव यावर्षी टँकरमुक्त केले आहे. त्यातून त्यांनी एकप्रकारे शासनाला मदतच केली आहे. या कामासाठी समितीने ग्रामपंचायत अथवा शासनाकडून कोणताही निधीन घेता हे काम लोकसहभागातून पूर्ण केले होते. भविष्यात शेवगे बुद्रुक हे आदर्श गाव करण्याचा या समितीचा मानस आहे.