अमरावती प्रतिनिधी । ‘आम्ही बंद हॉलमधली माणसं नाही. उघड्या मैदानात लढणारी माणसं आहोत. बोलतो, पाहतो, करतो असं बोलणारी शिवसेना नाही. जे बोलतो ते करतो, अशी शिवसेना आहे,’ तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर मी कर्जमुक्त करणार आहे. असे विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अमरावतीतील जाहीर सभेत केले आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीतर मी कर्जमुक्त करणार आहे. कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही. जसे मागेल त्याला शेततळे आपण दिले. तसेच जनावरांपासून शेती सुरक्षित ठेवण्यासाठी कुंपण दिले पाहिजे. ते आपण देणार आहोत. अमरावती विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ‘ही निवडणूक म्हणजे अन्यायाविरुद्धचे, धनदांडग्यांविरुद्धचे बंड आहे. बंड हे असलेच पाहिजे. अमरावती स्वाभिमानी आहे. इथं पैसा चालणार नाही. पैशांच्या विरोधात, दलालीच्या विरोधात आपल्याला बंड करायचे आहे. मागील वेळेस जरा गडबड झाली. संपूर्ण देशामध्ये भगवा असताना अमरावतीमध्ये भगवा नाही, याची मला खंत आहे. पण आता अमरावतीमध्ये युतीचे आठही आमदार निवडून आले पाहिजेत. भगव्याचे मावळे विकले जात नाहीत, हे दाखवून द्या, असे आवाहन उद्धव यांनी अमरावतीकरांना आज जाहिर सभेत केले आहे.