जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज जिल्हा दौर्यावर येत असून यात ते भव्य सभेला संबोधित करणार असून याची तयारी अतिशय जय्यत प्रकारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनतेशी संवाद साधणार असल्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने नाशिक येथे पहिला दौरा झाल्यानंतर ते जळगाव जिल्ह्यात येणार होते. या अनुषंगाने मुक्ताईनगर, धरणगाव आणि पारोळा येथे त्यांच्या सभांचे नियोजन देखील करण्यात आले होते. तथापि, पावसाळी वातावरणामुळे हा दौरा पुढा ढकलण्यात आला होता. यानंतर आज अर्थात ५ सप्टेंबर रोजी शरद पवार हे जळगाव जिल्हा दौर्यावर येत आहेत.
आज सकाळी ९.५० वाजता शरद पवार हे विमानतळावर येतील. यानंतर ते पहिल्यांदा महापौर जयश्रीताई महाजन यांच्या मेहरूणमधील निवासस्थानी भेट देतील. यानंतर ते १२ वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तर दुपारी दीड वाजता शहरातील सागरपार्क मैदानावर शरद पवार यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शरद पवार यांची जळगावातील सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. या तयारीसाठी पक्षाचे आमदार रोहित पवार हे आधीपासूनच जिल्ह्यात दाखल झाले होते. या सभेच्या नियोजनासाठी आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील,महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे परिश्रम घेत आहेत. आता सर्वांच्या नजरा या जळगावातील त्यांच्या सभेकडे लागल्या आहेत.