मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून सहकारी बँकांना वाचविण्यासाठी साकडे घातले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती केली आहे. पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे. असं झालं तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसंच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील, असं शरद पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे.
सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलणं हे समस्येचं निराकरण नाही, असंही ते म्हणाले. सहकारी बँकांना आर्थिक शिस्त लागावी याच्याशी आपण सहमत आहोत. परंतु सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून पैशांचा गैरव्यवहार त्वरित थांबेल असं म्हणणं चुकीचं ठरेल. २०१९-२० या आर्थिक वर्षात सहकारी बँकांमध्ये गैरव्यवहार कमी झाले असल्याचा दावा शरद पवार यांनी रिझर्व्ह बँकेची आकडेवारी दाखवत केला आहे. १०० वर्षे जुन्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान देणार्या सहकारी बँकांवर विनाकारण निर्बंध न घालण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.