मुंबई-वृत्तसेवा । राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला असून, या निवडणुकीत आघाडीची एकमेव जागा ‘ठाकरे गटा’च्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत उद्धव ठाकरे यांना थेट पाठिंबा जाहीर केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना दिलेल्या खंबीर पाठिंब्याची ‘परतफेड’ करण्याचा निर्णय पवारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. “विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल,” असे स्पष्ट वक्तव्य शरद पवार यांनी केले.

राज्यात लवकरच विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता, महायुतीला ८ जागा मिळण्याची शक्यता असून महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ १ जागा येणार आहे. या एकमेव जागेसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू होती, मात्र पवारांच्या भूमिकेमुळे आता हा तिढा सुटल्याचे मानले जात आहे.
पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, “राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी मला मोलाची साथ दिली. आता विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील.” तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्रितपणे चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुढील महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने, ते स्वतः पुन्हा उमेदवारी देणार की एखाद्या निष्ठावान सहकाऱ्याला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषदेतील एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. यामध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, शिवसेना (शिंदे गट)च्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे अमोल मिटकरी, राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे.


