शरद पवार पिंपरी चिंचवडमध्ये २० जुलै रोजी भव्य सभा घेणार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून आज ही पिंपरी- चिंचवडचे नाव घेतले जाते. याच बालेकिल्ल्यात आता शरद पवार गटाची ताकद वाढत आहे. २० जुलै रोजी शरद पवार यांची भव्य सभा होणार असून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. सभेला २० हजार कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे.

अजित पवार आणि पिंपरी- चिंचवडचं नातं सर्वांना परिचित आहे. शहराचा विकास हा अजित पवारांनी केला असं वारंवार म्हटलं जातं. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अजित पवारांची शहरातील ताकद कमी होताना दिसत आहे. अजित पवारांच्या पाठीशी ठाम उभे असलेले अनेक जण लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा आणि महानगर पालिका निवडणुका या खुणावत असल्याने शरद पवार गटात चाचपणी होत आहे. अशातच आता शरद पवार गट मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी शरद पवार यांची भव्य सभा होणार असून जुने आणि नवीन अशी मोट बांधण्यासाठी शरद पवार येणार असल्याची माहिती तुषार कामठे यांनी दिली आहे. जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या सोबत आहेत. तरुण (नवे) आणि जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोट बांधून पिंपरी- चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभेसाठी शरद पवार गट आग्रही आहे. अजित पवार गटाचे नव्वद टक्के माजी नगर सेवक हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. असं छातीठोकपणे तुषार कामठे सांगत आहेत. त्यामुळं आगामी काळात अजित पवार गटाची डोकेदुखी आणखी वाढू शकते.

Protected Content