मुंबई प्रतिनिधी । अजित पवार आणि कुटुंबातील अन्य सदस्यांशी बोलणे झाल्यानंतर सारे काही आलबेल असल्याचा दावा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.
काल सायंकाळी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपर्काबाहेर गेल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. त्यांनी रात्री शरद पवार यांच्याशी मोबाईलवरून बोलणे केले होते. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अजितदादांनी व्यथीत होऊन राजीनामा दिल्याची माहिती दिली होती. यानंतर आज दुपारी खुद्द अजित पवार हे पत्रकारांशी बोलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याआधी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवार कुटुंबियांची बैठक झाली. येथून बाहेर आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
याप्रसंगी शरद पवार म्हणाले की, आमचा हा कुटुंबातील अंतर्गत प्रश्न असून याचे निराकरण करण्यात आलेले आहे. चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच याबाबत खुद्द अजितदादाच जास्त माहिती देणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, अजित पवार हे थोड्या वेळाने आपले म्हणणे मांडणार असून यासाठी त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.